पन्नास वर्षातील सर्व माजी विद्यार्थ्यांचा एक आगळावेगळा मेळावा.
बिरामणेवाडी (जावली) : दि.1/12/2024 सातारा जिल्हा परिषद, सातारा पंचायत समिती जावली मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी एक छोटीशी वाडीतील शाळा. शाळेची स्थापना 15 ऑगस्ट 1974 रोजी झाली.यावर्षी शाळेचा सुवर्ण महोत्सव दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळेत होणारा हा पहिलाच विद्यार्थी मेळावा असेल जिथे 50 वर्षातील सर्व शाळेचे विद्यार्थी, गुरुजनवर्ग हे सर्वजण एकत्र आले.
शाळेच्या या सुवर्ण महोत्सव वर्षांमध्ये केक कापून शाळेचा 50 वा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शाळेमध्ये आतापर्यंत ज्यांनी अध्यापनाचे कार्य केले त्या सर्व गुरुजनांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सुवर्ण महोत्सवाचा दुग्ध शर्करा योग म्हणजे याच वर्षी शाळेतील उपक्रमशिल शिक्षिका सौ.अंजली गोडसे मॅडम यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचाही सर्व ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
या सर्व सुवर्णयोगा साठी गावातील लहान थोर ते आबाल वृद्धापर्यंत सर्वांनी श्रमदान वस्तुरूप आणि पैशाच्या स्वरूपात भरपूर असा शैक्षणिक उठाव केला. आजच्या या सुवर्ण महोत्सवासाठी शाळेतील अध्यापन केलेले गुरुजन श्री.रावसाहेब सोनबा कुंभार,श्री. सुरेश तुकाराम चव्हाण, श्री.परबती तुकाराम बामणे,श्री.शिवाजी विष्णू शिवणकर,श्री.शैलेश कल्याण महामुनी,श्री.अंकुश शामराव शिंदे, केंद्रप्रमुख श्री बबन मारुती शिंदे, सौ. सरिता अंकुशराव शिंदे,सौ कांचन ननावरे ,सौ.सीमा पार्टे ,सौ.सारिका पवार , सौ .अंजली गोडसे, सौ. योगिता बोराटे मॅडम उपस्थित होते. तसेच माजी विद्यार्थी 25 ते 65 वयात मधील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले उदाहरणार्थ उद्योग, कृषी ,शिक्षण,आरोग्य,वाहतूक सहकार व संरक्षण असे स्त्री पुरुष मिळून जवळजवळ 250 विद्यार्थी व त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थ असे 500 पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
हे सर्व विद्यार्थी नोकरी व्यवसाय निमित्त वेगवेगळ्या राज्यात, देशात , पर प्रांतातून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते.त्यांचेकडून या मेळाव्यासाठी त्याचबरोबर गुरुजींच्या सन्मानासाठी, सौ.अंजली गोडसे मॅडम यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ,जवळजवळ पाच लाखापर्यंत निधी जमा केला . त्यातील रोख 55 हजार रुपये निधी शाळेची निरंतर ठेव म्हणून ठेवण्यास मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आवर्जून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे चे माजी सहाय्यक आयुक्त तथा जावळीचे माजी गटशिक्षणाधिकारी व सातारा जिल्ह्याचे उपशिक्षण अधिकारी श्रीयुत रमेश चव्हाण साहेब हे उपस्थित होते.
माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक यांनी त्या त्या वेळचे आपले अनुभव कथन केले. विद्यार्थी व शिक्षकांना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला. मोठमोठ्या हुद्द्यावर असणारे विद्यार्थी शिक्षकांच्या समोर नतमस्तक झाले त्यामुळे शिक्षकांना सुद्धा भरून आले.
सौ.अंजली गोडसे मॅडम यांनी तर हे माझे दुसरे माहेर असल्याचे सांगितले आणि लोकांनी केलेल्या सढळ हातांच्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. श्री .शंकर बिरामणे सर शाळेचे पहिले माजी विद्यार्थी यांनी शाळा स्थापनेपासून ते आतापर्यंतचा प्रवास कथित केला.अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.चव्हाण साहेबांनी अशी शाळा आणि असे ग्रामस्थ होणे नाही असे म्हटले .शिवणकर गुरुजींनी पुन्हा मला या शाळेत शिक्षक झाल्यासारखे वाटले असे विद्यार्थ्यांना पाहून म्हटले.
दुपारच्या सत्रात सर्व उपस्थितांसाठी सर्व रोग निदान शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा लाभ गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि उपस्थित सर्वांनी घेतला. दान,मान आणि ज्ञान या तिन्हीचा त्रिवेणी संगम आज बिरामणेवाडी शाळेत दिसून आला.
अशा प्रकारचा कार्यक्रम सातारा जिल्हा परिषदेतील सर्व शाळेना दिशा देणारा आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत होणे गरजेचे आहे, अशी उपस्थित लोकांच्या मध्ये चर्चा झाल्याचे दिसून आले. एकंदरीत हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मंडळ बिरामणेवाडी, त्याचबरोबर श्री.तामजाई देवी उत्कर्ष मंडळ बिरामणेवाडी मुंबई,समस्त तामजाई देवी महिला मंडळ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अंजली गोडसे मॅडम यांनी केले.तर आभार श्री.शिवाजी शिवणकर आणि सूत्रसंचालन उर्मिला शिर्के मॅडम यांनी केले.
न्यूज मराठी लाईव्ह
बिरामणेवाडी (जावली)






