साताऱ्यात पत्रकारावर हल्ला, साथीदाराला किडनॅप; सिनेस्टाईल थरार, खंडणी मागितल्याची चर्चा


भुईंज (वाई) : एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी थरारक आणि तितकीच धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. साताऱ्यातील आज तक, लोकशाही व एम मीडिया या तीन माध्यम समूहाचा कॅमेरामॅन व इतर काही इलेक्ट्रॉनिक माध्यम समूहाचे काम करणारा पत्रकार जुबेर शेख याच्यावर भुईंज हद्दीत जबर हल्ला झाला. त्याच्या पोटात चाकू भोकसून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान यामुळे जुबेर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटात खोलवर जखम झाली आहे. त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.प्राथमिक माहितीनुसार भुईंज हद्दीतील एका बियरबार मध्ये जुबेर शेख, मयूर जाधव व महामुलकर हे तिघे गेले होते. यावेळी बारमधला कार्यक्रम उरकल्यानंतर तेथे आलेल्या तीन अज्ञातांनी या तिघांनाही गाडीत बसवून पिंपोडे परिसरात नेले. यादरम्यान जुबेर शेख याच्या पोटात चाकू खुपसला. यामध्ये जुबेर गंभीर जखमी झाला. तर मयूर जाधव व महामुलकर या दोघांना किडनॅप करण्यात आले. त्यातील किडनॅप केलेल्या दोघांनाही शोधण्यात पोलिसांना यश आल्याचे सूत्रांकडून समजत आहे. मात्र या प्रकरणाची दुसरी बाजू अशी आहे की, जुबेर हा साताऱ्यात राहतो. तो जेवणाच्या पार्टीसाठी भुईंज सारख्या ठिकाणी गेला होता का हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. तर तीन मित्र एखाद्या हॉटेलला जेवायला जातात, पार्टी करतात तो कार्यक्रम उरकल्यानंतर त्यांना किडनॅप केले जाते आणि त्यातील एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न होऊन त्याच्या पोटात चाकू खुपसला जातो, त्याच्यावर जीवघेणा हल्ला होतो हा एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतका थरारक आणि तितकाच धक्कादायक प्रसंग आहे. मात्र या प्रकरणाच्या आतली बातमी ही फारच वेगळी आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी शहरातील एका बेकायदेशीर प्रॉपर्टीच्या प्रकरणात या तिघांनी एका कुख्यात डॉनशी कनेक्शन असलेल्या लोकांच्या नातेवाईकांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून खंडणी मागितल्याची ही जोरदार चर्चा सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. दरम्यान भुईंज हद्दीतील त्या हॉटेलमध्ये तडजोड करायला गेल्यानंतर किडनॅप करून अज्ञातस्थळी नेऊन खुनी हल्ला झाल्याचे वास्तव आहे, असे देखील काही नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाला अनेक कांगोरे आहेत. मात्र या प्रकरणात पोलीस अधिक खोलात गेल्यास आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी ज्यांच्यावर हल्ला झाला त्या तिघांचेही सीडीआर तपासावेत अशी मागणी होत आहे. तर यामागचा सूत्रधार कुडाळ परिसरातील असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पोलिसांनी हल्ला करणारी टोळी व ज्यांच्यावर हल्ला झाला त्या तिघांच्या पाठीमागे उभी असलेली अंधारी टोळी या दोन्ही टोळीतील कोणालाही पाठीशी न घालता या प्रकरणातील सत्य आणि सहभागी असलेल्यांची नावे उघड करावीत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / भुईंज (वाई)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने