सातारा- जावली मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे यांची श्री क्षेत्र कुसुंबी गावभेट


प्रतिनिधी : श्री जितीन वेंदे 
कुसुंबी (जावली) : सातारा- जावली तालुक्यात प्रत्येक गावासह वाडी- वस्तीवर विकास पोहचला आहे. रस्त्यांच्या जाळ्यांमुळे सर्वसामान्य जनता विकासाच्या प्रवाहात आली आहे. सातारा व जावली तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ आणि जंगली भागामध्ये पर्यटनवाढीच्या योजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पर्यटनासह रोजगार आणि व्यवसायवृद्धीला प्राधान्य दिले आहे. विकासाच्या बाबतीत आपला मतदारसंघ राज्यात अग्रेसर आहे, हे सर्वमान्य आहे. असे असताना खुज्या आणि कोत्या वृत्तीच्या विरोधकांना विकास कसा दिसेल? काडीचे काम न करणाऱ्यांनी कितीही साळसूदपणाचा आव आणला तरी जनता भुलणार नाही. जनतेच्या प्रेम आणि पाठबळावर माझा विक्रमी विजय होणार यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 


           सातारा- जावली मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा गावभेट दौरा मोठ्या उत्साहात सुरु असून त्यांना जनतेतून मोठं पाठबळ मिळत आहे. प्रत्येक गावात आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे जल्लोषी स्वागत केले जात असून ते अबालवृद्धांसह मतदारांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक गावात झालेली विकासकामे, सुरु असलेली कामे आणि पुढे करावयाची कामे याबाबत ते ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत. 


             मी निवडणुकीपुरते राजकारण करणारा माणूस आहे. निवडणुकीनंतर जनतेच्या समस्या सोडवण्याला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि यापुढेही देणार आहे. विरोधी उमेदवाराला जिल्हा परिषदेला मी निवडून आणलं, शिक्षण सभापती केलं, त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना कशाचीही जाण नाही. जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगायला हवी. गेल्या पाच वर्षात एकाही गावात न फिरणारे आता जनतेसमोर जाऊन मोठमोठ्या थापा मारत आहेत. ज्याने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले तो स्वतःला कोयनेचा सुपुत्र म्हणतो, जावलीचा सुपुत्र म्हणतो. 


स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्यांनी जनतेबद्दल खोटा कळवळा आणू नये. तुमच्या म्हणण्याने मतदारसंघात झालेला विकास पुसून जाणार नाही याचे तरी भान ठेवले पाहिजे. मी जनतेचा सेवक आहे. जनतेसाठी मी अहोरात्र उपलब्ध असतो. कोणी कितीही भूलथापा मारल्या तरी जनता माझ्यासोबत आहे. माझा विजय निश्चित असून निकालांनंतर जनताच तुम्हाला घरचा रस्ता दाखवेल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.




न्युज मराठी लाईव्ह 
कुसुंबी / जावली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने