वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा: नागरिकांची मागणी
केळघर (जावली) : वरोशी येथे बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून काल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वरोशी येथील शिवराम लक्ष्मण गोळे यांच्या दोन वर्षांच्या खिलार जातीच्या वासरावर बिबट्याने अचानक हल्ला करून वासरू फस्त केले आहे. नांदगणे गावच्या हद्दीत जोडमोरी परिसरात वासराचे अवशेष मिळून आले आहेत. या अवशेषचा वनविभागाने पंचनामा केला आहे. भर वस्तीत केळघर घाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. केळघर घाटात ही वाहन चालकांना बिबट्या दिसून आल्याची माहिती समजत आहे. तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये मनामध्ये बिबट्याच्या मुक्त वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानात चरायला गेलेल्या शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर बिबट्या हल्ला करू लागल्याने शेतकरी भयभीत झाले असून वनविभागाने या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी, वाहतूकदारांनी व नागरिकांनी केली आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / केळघर (जावली)
