सातारा जिल्ह्यातील ठोसेघर-सज्जनगड परिसरात बोरणि घाटात एक तरुणी सेल्फी काढत असताना दरीत कोसळली होती. या तरुणीला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने बाहेर काढले.
सातारा : जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित होत आहेत.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धबधबे, पर्यटन स्थळे व धोकादायक धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना सक्त मज्जाव केला आहे. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसून पर्यटनस्थळांवर युवक, युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी व पर्यटक पोलिसांचा डोळा चुकून जात असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर घटना समोर येत आहेत. नुकतीच कास पठारावर स्कॉर्पिओ कार दरीत कोसळून एक ठार, तर सहा जण जखमी झाले होते.
ठोसेघर-सज्जनगड परिसरातील बोरणे घाटात आज एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना तोल अडीचशे फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ती ४० फुटावरच एका झाडीत अडकली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. तिला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने सहीसलामत बाहेर काढून साताऱ्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी दाखल केले आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / सातारा
