मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते काढणाऱ्यास अटक

श्री.लालासाहेब माने (पाटील)
प्रतिनिधी / सातारा

सातारा : ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आ. जयकुमार गोरे यांच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडून पैसे मागणाऱ्या इसमास पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्यावर जयकुमार गोरे यांचा फोटो वापरला होता. त्या खात्यावरून काही महिलांना व इतरांना मेसेंजरद्वारे पैसे तसेच मोबाईल नंबर मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तांत्रिक तपास करून आरोपी वैभव पोपट पानस्कर (रा. सुर्याचीवाडी, ता. खटाव, मुळगाव गोपुज) यास अटक केली.

आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोनि घनश्याम सोनवणे करीत आहेत.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक मा. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग मा. रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पो. हवा शिवाजी खाडे, पो. हवा किरण चव्हाण, पो. कॉ. कुंडलिक कटरे, पो. कॉ. विजय खाडे व पो. कॉ. सत्यवान खाडे यांचा सहभाग होता.


न्यूज मराठी लाईव्ह 
म्हसवड / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post