बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील)
सातारा
सातारा : दि. ०८ जुलै २०२५ सातारा तालुक्यातील शिवथर येथे दि. ७ जुलै रोजी दुपारी १२ ते ३.३० वाजेच्या सुमारास पूजा प्रथमेश जाधव (वय २७) या विवाहित महिलेचा तिच्या घरात धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या ८ तासांत पोलिसांनी या खुनाचा छडा लावून प्रियकर आरोपीला पुणे येथून अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश देण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या तपासात आणि गोपनीय माहितीच्या आधारे धक्कादायक माहिती समोर आली. मृत पूजा जाधव हिचे शिवथर येथील २८ वर्षीय एका इसमासोबत गेल्या सहा वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध होते. आरोपी प्रियकर पूजावर पळून जाऊन लग्न करण्यासाठी वारंवार दबाव आणत होता, मात्र पूजाने यास नकार दिला होता.
दि. ७ जुलै रोजी पूजाच्या घरी प्रियकर आरोपी आला असता, त्याने पुन्हा एकदा पळून जाऊन लग्न करण्याची मागणी केली. पूजाने याला नकार दिल्याने चिडलेल्या आरोपीने तिचा हाताने गळा दाबून, त्यानंतर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तिचा खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या माहितीनंतर पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ विविध पथके तयार केली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे आणि त्यांच्या पथकाला आरोपी पुणे येथील स्वारगेट परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ सूत्रे हलवून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. यामुळे खुनाचा गुन्हा अवघ्या ८ तासांत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
आरोपीला अटक होईपर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले हे पोलीस ठाण्यात थांबून अधिकाऱ्यांना सूचना आणि मार्गदर्शन करत होते.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे, पोलीस हवालदार दादा स्वामी, पंकज ढाणे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण, मनोज गायकवाड, रामचंद्र गोरे, संदीप आवळे, राहुल राऊत, सचिन पिसाळ, कुमठेकर, पोलीस नाईक सतीश बाबर, प्रदीप बाबर, पोलीस शिपाई सुनील भोसले, संदीप पांडव, संदीप फणसे या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण कामगिरी करत आणि कोणतीही ठोस माहिती नसताना आरोपीला ८ तासांच्या आत अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे करत आहेत.
न्युज मराठी लाईव्ह
सातारा